२५ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय रद्द केला नाही, तर महाराष्ट्रामध्ये एकाही मंत्र्याला फिरू दिले जाणार नाही. त्यांच्या गाड्यांवर कांदे फेकून आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.
देशातील कांद्याचे भाव वाढत असून, ते नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील या निर्णयाविरोधात शेतकर्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे
याबाबत शेतकर्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी इशारा दिला आहे, की केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकर्यांचा उद्रेक पाहिला आहे; पण त्यापासून कोणत्याही धडा घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरीदेखील आगामी विधानसभा निवडणुकीत त्याच पद्धतीप्रमाणे उत्तर देतीलच; परंतु तातडीने कांदा आयातीचा निर्णय बदलला नाही, तर नाशिकसह महाराष्ट्रामध्ये केंद्र व राज्य सरकारचे जे मंत्री फिरतील, त्यांच्यावर कांदाफेक आंदोलन करण्यात येईल आणि याबाबत जाब विचारण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
Copyright ©2024 Bhramar