नाशिकरोड (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज (दि.23) सकाळी नाशिकरोड येथे नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे टोनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामुळे सिन्नरकडे जाणाऱ्या आणि नाशिककडे येणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारने निर्यात शुल्क मागे घेऊन कांद्याला 4 हजार रुपये हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, टोमॅटोची आयात बंद करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत रस्त्यावर कांदे फेकले. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका कार्याध्यक्ष गणेश गायधनी, ज्येष्ठ नेते रमेश औटे, भाईजान बाटलीवाला, अशोक खालकर, बाळासाहेब मते, तसेच महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक कदम यांच्यासह सुमारे 50 ते 60 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.