राजकीय घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन ; म्हणाले…
राजकीय घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन ; म्हणाले…
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती समोर आली  आहे. विधानसभेचा आज कार्यकाळ संपतो आहे. अशात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आज काय निर्णय घेणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. शिवाय महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीला मुख्यमंत्री कोण हे जाहीर करता आलेलं नाही. राज्यामध्ये 232 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन दिवसांमध्ये ठरवता आलेलं नाही.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी नोंदवलं आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री सूत्रानुसार फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूने दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.  

काय म्हणाले शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीट) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या घराबाहेर न जमण्याचं आवाहन केलं आहे. "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही  एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो," असं मुख्यमंत्री शिंदेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच, "माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील," असंही मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group