राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या सरकारी बंगल्यावर जनता दरबार सुरू असताना ही घटना घडली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानी आज बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी अनेक नागरिक तक्रार आणि समस्या घेऊन दाखल झाले होते. तेव्हा हल्लेखोर सुद्धा तक्रार देण्यासाठी जनता दरबारात हजर झाला. रेखा गुप्ता जनता दरबारात होत्या. त्यावेळी संबंधित व्यक्तीने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, हा व्यक्ती अचानक आक्रमक झाला त्याने रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली. या व्यक्तीने अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या. त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.