राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
राजभवनात काय घडलं?
त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.
मात्र, यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११.१५ च्या दरम्यान राजभवन गाठलं. यावेळी त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते.
राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे