मी पुन्हा येईन अशी गर्जना देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. आज गुरुवारी (5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आजच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. यावेळी कोणता निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी काल एकत्र राजभवनात दाखल होत सत्तास्थापनेचा दावा केला.
आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यानुसार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळा किती वाजता?
महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल, असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.