चंदीगड : नायब सिंह सैनी यांनी शुक्रवारी हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात क्रॉनिक किडनीच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध असेल. तसेच, भविष्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे नायब सिंह सैनी यांनी सांगितले.
गुरुवारी (दि.१७) नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. नायब सिंह सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
याशिवाय, भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी नायब सिंह सैनी यांच्यासह १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.