हरयाणामधील हिसार जिल्ह्यात दाट धुक्यामुळे आज सकाळी एक मोठा अपघात झाला. या अपघातात तीन वाहनं दुर्घटनाग्रस्त झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताबाबत आता पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार , हिसार-चंडीगड राष्ट्रीय महामार्गावर उकलाना येथे धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक कार दुभाजकावर आदळली आणि उलटली.
त्यामुळे मागाहून येणाऱ्या गाडीलाही अपघात झाला. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनं पाहण्यासाठी घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली. त्याचवेळी आलेल्या एका भरधाव ट्रकने या लोकांना चिरडले. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले.
हा अपघात शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास उलकाना येथील सुरेवाला चौकात झाला. अपघातामधील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
आज सकाळी सुरुवातीला अपघात झालेली कार ही नरवाना येथून येत होती. धुक्यामुळे कारचालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही कार दुभाजकावर आदळली आणि तिथेच उलटली. त्यानंतर मागून येणारी आणखी एक कार या कारवर धडकली.
त्यानंतर घटनास्थळावर काय झालं हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. त्याचवेळी नरवानाच्या दिशेने भरधाव आलेल्या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना चिरडले आणि हा ट्रकसुद्धा पलटी झाला. त्यात ४ जण मृ्त्युमुखी पडले. तर आणखी काही जण जखमी झाले.