तोडगा नाहीच! मनोज जरांगे यांनी सरकारचा नवा जीआरही धुडकावला; उपोषण सुरूच राहणार
तोडगा नाहीच! मनोज जरांगे यांनी सरकारचा नवा जीआरही धुडकावला; उपोषण सुरूच राहणार
img
Dipali Ghadwaje
जालना: मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अशातच मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

दरम्यान, जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाच्या जीआरमध्ये कोणतीही ददुरुस्ती नसल्याने माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं प्रयत्न अपयशी ठरला असून, जरांगे यांचे उपोषण सुरूच राहणार आहे. 

तर, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी पाठवले जीआर... 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच, जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेत सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवली असल्याची देखील माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना एक बंद पाकिटात जीआर देखील पाठवले आहे. हेच बंद पाकीट घेऊन शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी हे जीआर मनोज जरांगे यांना दिले असून, त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा १२ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. ते सध्या फक्त पाणी आणि सलाईनच्या आधारे दिवस कंठत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला होता. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांची आई आणि कुटुंबीय उपस्थित होते. ‘राज्य सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नसेल तर आज, शनिवारपासून पाणीही पिणार नाही आणि सलाइन लावून घेणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. संवाद साधत असताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे आजच्या त्यांच्या या निर्णयानंतर हे प्रकरण पुढे काय वळण घेईल हे बघणं महत्वाचं ठरेल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group