मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात बुधवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार ही बाब स्पष्ट झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे.
दरम्यान दिल्लीतील या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराज देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत आता डेडलॉक संपल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी उच्चारलेल्या 'डेडलॉक' या शब्दाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी लवकरच भाजपचे केंद्रीय निरिक्षक मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदी कोण असेल याचं नाव निश्चित करुन औपचारिक घोषणा करतील. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले.
आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.