जुलै महिन्यात पुण्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. 32 वर्षांमधला सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा मोठ्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुण्याच्या हडपसर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. एक तासाहून अधिक वेळ पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आहे. दरम्यान , काही वेळात मुख्यमंत्री या भागात श्रीराम शिल्पाच्या अनावरणासाठी येणार आहेत, त्याआधीच हडपसरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.
पुण्याच्या हडपसर भागामध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एका तासाच्या पावसामध्येच गुडघाभर पाणी साचलं आहे, यामुळे गाड्यांमध्येही पाणी शिरलं आहे. तसंच या पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातही अडचण निर्माण झाली.
या आधी 25 जुलैला पुण्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. 32 वर्षांमधला सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले होते. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळेही पुण्याच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.