काही दिवसांच्या विश्रांती नंतर आता पावसाने पुन्हा एकदा राज्यात जोर धरायला सुरुवात केली आहे . दरम्यान, येत्या २४ तासांत काही भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे . राज्यात मराठावाडा आणि विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार सरी बरसत आहेत. यामुळे या भागांतील नद्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार आहे. दरम्यान , हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे
तसेच , येत्या १२ तासांत पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये कमी दाबाचा निर्माण झालेला पट्टा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. यामुळे आयएमडीकडून पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भागात पाऊस पडणार आहे. तसेच जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला मुसळधार पाऊस पडणार आहे.
तसेच , परभणी जिल्ह्यात 36 तासांपासून जास्त पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील 50 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच दोन दिवसांपासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे पैनगंगा नदीवरील किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. यंदा सहस्त्रकुंड धबधब्याचे रुद्र रूप प्रथमच पाहायला मिळत आहे.