पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यांचा शोध कुटुंब घेत होते. तसेच कार्यालयात त्यांनी काही सूचना दिली नव्हती. अखेर तीन दिवसानंतर त्यांच्यासंदर्भातील धक्कादायक प्रकार समोर आला.
गुंजाळ यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. लोणावळा येथील टायगर पॉइंटजवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळून आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा गुंजाळ हे मावळातील लोणावळा येथे पुणे पोलीस आयुक्तल्यातील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी लोणावळा येथील टायगर पॉईंट परिसरात शिवलिंग पॉइंटवर जीवन संपवले. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे गुंजाळ हे अधिकारी होते. तीन दिवसांपासून कार्यालयात काहीच न सांगता ते गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. यामुळे कुंटुंबही चिंतेत होते. खडकी पोलीस त्यांची मिसिंगची तक्रार घेणार होते. त्यापूर्वी गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली.
पोलिसांना ११२ या क्रमांकावर एक कॉल आला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचल्यावर त्यांना अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवला. घटनास्थळी एक क्रेटा गाडी होती.
दरम्यान अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या का केली? यासंदर्भात कोणतेही कारण समोर आले नाही. कार्यालयातील ताणतणाव की कुटुंबातील तणाव किंवा इतर कोणत्या कारणामुळे जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल त्यांनी उचलले, हे तपासानंतर समोर येणार आहे.