बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्येप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले आहे. तर फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आज (३ जानेवारी) मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजातील अनेकजण उपस्थित होते.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी १० जानेवारी रोजी जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.
मराठा समाजाच्या बैठकीमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावे यासाठी राज्य शासनाकडे निवेदन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. याशिवाय देशमुख यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावी यासाठीही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती केली जाणार आहे.