सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांना आमदार पदावरून पायउतार करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
नाशिक सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार, त्यांनी पदावर राहणं अनुचित आहे. न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेला अद्याप स्थगिती मिळालेली नसून फक्त अपिलाचा निर्णय होईपर्यंत शिक्षेचं निलंबन करण्यात आलेलं आहे.
त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतर्फे करण्यात आली आहे. या शिक्षेला अनुसरूनच बच्चू कडू यांना आमदार पदावर राहता येणार नाही.
त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी करणारी रिट याचिका अजित रानडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. बच्चू कडू यांनी नाशिक आयुक्तांवर हात उगारल्याच्या प्रकारणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२०१७ मध्ये अंपगाच्या मागण्यांसाठी त्यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.