पोरखेळ करताय का..? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना पुन्हा झापलं! म्हणाले...
पोरखेळ करताय का..? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना पुन्हा झापलं! म्हणाले...
img
Dipali Ghadwaje
सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असंही सरन्यायाधीश म्हणाले आहेत. पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्याकडून आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
 
विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे, जूनपासून या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत आता सुनावणी व्हायला हवी अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
 
विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिरंगाई केली जात असल्याचे सांगत उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी केली जात आहे. आजच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई सुप्रीम कोर्टात उपस्थित होते.
 
सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीबद्दल माहिती देताना ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी या सांगितले की, येत्या १७ तारखेला (मंगळवारी) तुम्ही परत या आणि नवीन रुपरेषा द्या. कारण हा पोरखेळ चालू आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक कोर्टाला मान्य नाहीये. तुम्ही आमच्या आदेशाची पायमल्ली करत आहात, तसेच अध्यक्षांना समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल यांनी अध्यक्षांसोबत बसावं आणि त्यांना सुप्रीम कोर्ट काय असतं आहे ते समजवून सांगावं आणि आमचे आदेश पाळले गेले पाहिजेत हे देखील सांगावं अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. 

जर तुम्ही निश्चीत वेळापत्रक दिलं नाही तर आम्हाला दोन महिन्याचा कालावधी तुमच्यावर लादावा लागेल असे देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. यावेळी कपील सिब्बल आणि तुषार मेहता यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर खूपच कडक शब्दात ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळाले. एवढा राग आलेले सरन्यायाधीश मी कधीही पाहिले नाहीत असेही ॲड. शिंदे यावेळी म्हणाले.

पोरखेळ चालू आहे. पुढच्या निवडणूका येण्यापूर्वी निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकांसाठी थांबला आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला. तसेच अध्यक्षांना मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही प्रकरणांमध्ये वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group