आज ऐतिहासिक फैसला होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष , काय आहे प्रकरण.....
आज ऐतिहासिक फैसला होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष , काय आहे प्रकरण.....
img
Dipali Ghadwaje

सुप्रीम कोर्ट आज एक महत्त्वाच्या निकाल देणार आहे. जम्मू काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळणार, की केंद्र सरकारने घेतलेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय कायम राहणार? यावर आज सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे.

५ ऑगस्ट  २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द केलं होतं. त्यानंतर राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं. केंद्राच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

कलम ३७० हटवण्यावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात अनेक हस्तक्षेप याचिका दाखल झाल्या. या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या ५ सदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली.

सुनावणी दरम्यान, कोर्टाने कलम ३७० रद्द करण्याचा बचाव करणार्‍यांचा युक्तिवाद ऐकला. केंद्रातर्फे अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील हरीश साळवे, राकेश द्विवेदी, व्ही गिरी आणि इतरांनी बाजू मांडली.

तर कपिल सिब्बल, गोपाल सुब्रमण्यम, राजीव धवन, जफर शाह, दुष्यंत दवे आणि इतर ज्येष्ठ वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. तब्बल १६ दिवस सुरू असलेल्या या सुनावणीवर कोर्टाने सरकारी आणि विरोधी पक्षाची बाजू ऐकून घेतली.

दरम्यान ५ सप्टेंबरला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे केंद्र सरकारसह संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.







इतर बातम्या
Join Whatsapp Group