लष्करी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रक्त संक्रमणामुळे हवाई दलातील अधिकारी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत लष्कर आणि हवाई दलाला दंड ठोठावला आहे. लष्करी रुग्णालयाच्या निष्काळजीपणा हवाई दलातील माजी अधिकारी एचआयव्ही संक्रमित झाले होते. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला 1.54 कोटींचा दंड ठोठावला आहे.
संक्रमित रक्त चढवल्याने हवाई दलातील अधिकारी HIV बाधित
लष्कराच्या रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह झालेल्या वायुसेनेच्या एका माजी अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लष्कराच्या रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हवाई दलाचे माजी अधिकारी 2002 मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी पार पडली. भारतीय हवाई दलाला माजी हवाई दल अधिकाऱ्याला 1.54 कोटी रुपये भरपाई देण्याचे निर्देश भारतीय लष्कर आणि हवाई दलाला देण्यात आले आहेत.
'निष्काळजीपणासाठी हवाई दल आणि लष्कर जबाबदार'
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, "वैद्यकीय निष्काळजीपणामुळे याचिकाकर्ता 1 कोटी 54 लाख 73 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे. यासाठी व्यक्ती कोणालाही जबाबदार धरू शकत नाही, त्यामुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर या निष्काळजीपणासाठी जबाबदार आहे. ही रक्कम भारतीय हवाई दल 6 आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला देईल. भारतीय हवाई दल लष्कराकडून अर्धी रक्कम मागू शकतात. या माजी हवाई दल अधिकाऱ्याची सर्व देणी 6 आठवड्यांच्या आत देय केले जावे." सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांच्या संदर्भात सरकार, न्यायालये, न्यायाधिकरण, आयोग आणि अर्ध-न्यायिक संस्थांसाठी HIV कायदा, 2017 अंतर्गत काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
याचिकाकर्ते माजी हवाई दल अधिकाऱ्यावर 2002 साली लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. हे अधिकारी 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या 'ऑपरेशन पराक्रम' चा एक भाग होते. माजी हवाई दल अधिकारी 'ऑपरेशन पराक्रम' दरम्यान ड्युटीवर असताना आजारी पडले होते. त्यांना जुलै 2002 मध्ये लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि यावेळी त्यांना रक्त चढवण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं.