मराठा आंदोलनाला बच्चू कडूंचा पाठिंबा म्हणाले,
मराठा आंदोलनाला बच्चू कडूंचा पाठिंबा म्हणाले, "राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळावा", अन्यथा....
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने शब्द पाळला नाही तर मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात उभं राहणार असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू यांनी दिला.  मनोज जरांगे यांनी दिलेली 24 तारीख जवळ येत आहे, 17 तारखेला जरांगे नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत असंही ते म्हणाले. सरकारने मनोज जरांगे यांना आतापर्यंत शिंदे समितीने काय काय काम केलं त्याचा अहवाल द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
 
आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करून जरांगे यांच्या आंदोलन थांबवले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्या मागणीला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दिला आहे. 

या आधी मराठा आरक्षणावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, "निवडक मराठ्यांना आपण वाळीत टाकण्याचं कामक करत आहे. तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे. हे आरक्षण 52 टक्क्यांपर्यंत जातं. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण वाढवून घ्या किंवा अ, ब, क, ड असे भाग करा. मराठा ओबीसी नाहीत का? मराठा कोण आहे? की मराठा पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे? त्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही?"

अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या वेळी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करत आमदार बच्चू कडू म्हणाले की मी जरांगे यांना शब्द दिला आहे त्यामुळे मी शब्दांचा पक्का आहे, नाहीतर मी जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार.

गेल्या 70 वर्षांत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी काय केलं? 
गेली 70-75 वर्षे ओबीसी नेते  सत्तेत होते, तेव्हा  त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं? असा थेट सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला. गेल्या 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आलाच नसता हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. त्यामुळे ओबीसी सभेप्रमाणेच सर्व मतभेद, पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमंजुरांसाठी एकत्र यावे, आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ असा  सल्ला बच्चू कडू यांनी दिला. जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे असे मत देखील बच्चू कडू यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group