बदल्यांचा सुलतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंडे यांची दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन बदली करण्यात आलीय. दरम्यान बदली झाल्यामुळे तुकाराम मुंढे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. अप्पर मु्ख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंढे यांना बदलीचं पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या पदाचा कारभार आता राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तुकाराम मुंडे त्याच्या प्रामाणिकपणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणून ओळखले जाते. कारण तुकाराम मुंडे यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत २२ वेळा बदली झाली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे बदल्यांना सामोरे जावे लागल्याचं मानलं जातंय. कडक शिस्तीमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीय.
तुकाराम मुंढे एक शिस्तप्रिय अधिकारी असल्याचं मानलं जातं. मुंढे जिथे जातात तिथे दबदबा निर्माण करतात. त्यांनी नवी मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. पुण्यात पीएमपीएलचे आयुक्त म्हणून देखील मुंढे यांनी काम पाहिलं. त्यांच्या कामाच्या धडाक्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरते. तुकाराम मुंढे धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. तुकाराम मुढेंची पुन्हा बदली झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.