पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्यात. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता थाटात रुबाब करणाऱ्या आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांचे एक, दोन नाहीतर अनेक कारनामे बाहेर आले आहेत. केवळ पूजा खेडकरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कारनामे, अरेरावी यासंदर्भातील प्रकार समोर आलं आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.
अरेरावी, दमदाटी करत मुळशीतली जमिनही बळकावली
वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ही जमिन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं.
आश्चर्याची बाब म्हणजे, या शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला आहे. वरून दबाव आल्यानं त्यांची साधी तक्रारही नोंदवली गेली नाही. त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.
LBSNAA नं मागवला डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल
लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ने महाराष्ट्र सरकारकडून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे.
ट्रेनी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट OBC जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
वादानंतर नागरी सेवा परीक्षेत निवडीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबतही आता नवी माहिती समोर आली आहे. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडेसादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा केल्याची माहिती मिळत आहे.