उद्योगपती मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब शिर्डी साईबाबांचं परमभक्त म्हणून ओळखलं जातं. अंबानी कुटुंबीयांची साईबाबांवर अतूट श्रद्धा आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि सुपुत्र आकाश अंबानी हे न चुकता वर्षातून दोन ते तीन वेळा शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेत असतात. दरवेळी साईबाबांच्या समाधीवर निळ्या रंगाची चादर अर्पण करतात. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी हे देखील शिर्डी साईबाबांचे मोठे भक्त असून सोमवारी अनंत अंबानी शिर्डी येथे आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल पाच कोटी रुपयांची देणगी अर्पण केलीय.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी हे देशातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन पूजा करताना दिसतात. नुकतेच अनंत अंबानी हे शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी दर्शनासाठी गेले होते. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर साईचरणी पाच कोटींची देणगी दिली आहे. ख्रिसमस उत्सव आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांनी साईंच्या दरबारी जाऊन पूजा-अर्चना केली. त्यांनी निळी चादर अर्पण केली आणि सायंकाळच्या आरतीतही सहभाग घेतला. साईबाबा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितले की, अनंत अंबानी यांच्याशी वेगवेगळ्या धर्मादाय उपक्रमांबद्दलही चर्चा झाली. उद्योगपती अनंत अंबानी यांनी मंदिरात येऊन आरती केली. त्यांनी मंदिराला पाच कोटी रुपये दान केले.