अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी याठिकाणी तीन जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आला आहे. यातील दोनजण हे शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे कर्मचारी होते. या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या वेळी कामावर जाताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या घटनेनंतर शिर्डी साई संस्थानने दोन दिवसांमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता.
त्यानंतर आता आज मोफत प्रसाद भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आता टोकन पद्धतीने मोफत जेवण मिळणार आहे.
साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना कुपन मिळणार आहेत. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेत उदी काऊंटरवर कुपन वितरित करण्यात येणार आहेत. तसंच संस्थानच्या भक्त निवासातही भोजनासाठी कुपन दिले जाणार आहेत. शिर्डीमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मंदिर संस्थानाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
साई प्रसादालयात रोज 50 ते 60 हजार भाविक मोफत भोजनाचा लाभ घेतात. पण प्रसादालयात जेवणासाठी आता कूपन आवश्यक आहे. दुहेरी हत्याकांड तसंच सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. याआधी मोफत जेवणासाठी प्रसादालयात थेट प्रवेश होता, पण वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवार म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.