शिर्डीच्या साई मंदिरला भीषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मेल साई संस्थानला २ मे रोजी सकाळीच प्राप्त झाला असून, धमकीचा मेल मिळाल्यानंतर साई संस्थानसह पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तसेच साई मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेतही वाढ करण्यात आली आहे. हा धमकीचा मेल नेमका कुणी पाठवला, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. या मेलद्वारे साई संस्थानला भीषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यापूर्वी देखील धमकीचे फेक मेल अज्ञातांकडून पाठवण्यात आले होते. मात्र, ते धमकीचे मेल फेक असल्याचं आढळून आले होते. त्यामुळे २ मे रोजी पाठवण्यात आलेला मेल फेक आहे की, कुणाचा खोडसाळपणा, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धमकीच्या मेलमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, साई संस्थानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या मेलमुळे भाविक आणि परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.