रामनवमी उत्सव निमित्त शिर्डी येथील साईबाबा मंदिर बुधवारी (ता. 17 एप्रिल) भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. यामुळे परगावहून आलेल्या भाविकांना साईबाबा यांचे दर्शन घेण्यास सुलभ हाेणार आहे. भाविकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन साई संस्थान तर्फे करण्यात आले आहे.
साई दरबारी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी रामनवमी हा महत्वाचा उत्सव मानला जातो. साईबाबा हयात असल्यापासून शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ आजही ही परंपरा जाेपासत आहेत.
शिर्डीतील रामनवमी उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. साईंच्या शिर्डीत उद्यापासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात होत आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच 17 एप्रिल रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. या तीन दिवसीय उत्सव काळात साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने साई भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य असा पौराणिक देखावा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.