लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मागील महिन्याभरामध्ये अनेकदा या कामगिरीचं खापर अजित पवार गटावर फोडण्यात आलं आहे. आधी 'ऑर्गनायझर' आणि त्यानंतर 'विवेक साप्ताहिका'मधून अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय अंगलट आल्याचं भाजपाच्या राज्यातील सुनावताना म्हटलं गेलं.
मात्र आता अजित पवार गटावर होणाऱ्या या टीकेवरुन भाजपाने थेट संघाकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
या बैठकीमध्ये काय घडलं?
पुढील काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत पार पाडली.
या बैठकीमध्ये भाजपाच्या नेत्यांनी संघाला विधानसभेला सहकार्य ठेवण्याची मागणी केली. भाजप आणि संघाच्या बैठकीत राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली.
भाजपाने आपली भूमिका संघासमोर स्पष्ट करताना, "अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळेच संघाने अजित पवार गटावर टीका करणं टाळावं," अशी विनंती देखील भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत केल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाकडून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. तसेच बैठकीसाठी कोकण प्रांतातील संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती या बैठकीला होती.