कैसा हराया... या दोन शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत आल्या आहेत. सहर शेख यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडणुक लढवली होती. शेख यांनी मोठा विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. दरम्यान त्यांच्या कैसा हराया...या डायलॉगची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. दरम्यान सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे.
एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. त्यामुळे आता सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.
ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे.
सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविका आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या. निवडणुकीवेळी सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांनी मुंब्रातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती.