साधारणतः शाम्पू जास्त प्रमाणात वापरल्याने केस गळतात असे मानले जाते. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शाम्पू वापरला नाही त्यांचेही केस अचानक गळू लागल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांत एका अजब आजारानं चांगलंच थैमान घातलं आहे. तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणं थोडं कठीण होईल पण हे खरं आहे. लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसांत डोक्यावर टक्कल होते.
मिळालेल्या माहितीनुसार , जिल्ह्यातील बोंडगाव, हिंगणा, कालवड या तीन गावात या आजाराचा प्रादु्र्भाव दिसून येत आहे. हा आजार नेमका काय आहे, कशामुळे होत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार आहे असे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले आहे.
फंगल इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप ठोस माहिती नाही. पाणी आणि त्वचेचे नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचे अहवाल हाती आल्यानंतरच या आजाराचं खरं कारण समजू शकणार आहे. ज्या गावात असे रुग्ण आढळून आले आहेत त्या गावात वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण करण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील शेगाव तालु्क्यात बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजनाथ, घुई या गावांत टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 पर्यंत पोहोचली आहे.
या आजाराच्या लक्षणांचा विचार केला तर सर्वात आधी डोक्याला खाज सुटते. नंतर केस गळू लागतात. तिसऱ्या दिवशी चक्क टक्कलच पडते. त्यामुळे नागरिकांत भीती पसरली आहे.