बुलढाण्यामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. घरात बहिणीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच साहित्य घेऊन येणाऱ्या दोन तरुणांच्या बाईकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गाडीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सम्राट ज्ञानेश्वर इंगोले (वय, २०) व अजय प्रल्हाद इंगोले (वय, १९) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. घरात बहिणीच्या लग्नाची गडबड सुरू असतानाच भीषण अपघातात दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडना बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात घडली. बहिणीच्या लग्नकार्यात लागणाऱ्या जेवणाच्या स्वयंपाकाचे साहित्य घेऊन हे दोन्ही तरुण दुचाकीवरुन निघाले होते.
यावेळी घारोड गावानजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की तरुणांच्या बाईकचा अक्षरशः चक्काचूर झाला.
दरम्यान, एकीकडे घरात लग्नसोहळ्याचा उत्साह असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.