भंडारा जिल्ह्यात पोळा सणाच्या उत्सवात पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील भाऊ ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे. तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील नागपूर-रायपुर महामार्गावरील पिंपळगाव/सडक येथील भाऊचा ढाबा जवळ पहाटेच्या सुमारास एका मालवाहू ट्रक आणि ट्रॅक्स यांच्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हायवे पोलीस अधिकारी रवींद्र रेवतकर यांनी ही माहिती दिली.
अपघात कसा झाला?
वाहनातील सर्व मृत प्रवासी हे मूळचे छत्तीसगडचे आहेत. ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. नागपूरच्या दिशेने जाताना भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावर निघणाऱ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या मजुरांच्या ट्रॅक्सने धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात नऊ जण जागीच ठार झाले. तर जखमींना भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. तसेच त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या भीषण अपघातात घटनास्थळावर 8 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या संख्येत आणखी एक वाढ झाली, त्यानंतर नागपूरला उपचारासाठी नेण्यात येणाऱ्या एका महिलेचा वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांचा आकडा आता 9 वर पोहोचलाय. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 बालकांचा समावेश आहे. 55 वर्षीय एका महिलेसह मृत पावलेल्या उर्वरित सर्व महिला या 35 वयोगटातील आहेत. तर, ३ बालक हे सर्व 5 वर्षाखालील आहे. या सर्व अपघातग्रस्त महिला छत्तीसगडमधून नागपूर येथील त्यांच्या माहेरी तिज उत्सवासाठी जात होते. सोमनाथ वर्मा या व्यक्तीच्या कुटुंबातील आई, बहीण, भाची आणि बहिणीची जाऊबाई अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातग्रस्त वाहनांमध्ये 16 ते 17 जण प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.