समृद्धी महामार्गावरील 12 जणांच्या मृत्यूला आरटीओ जबाबदार, RTOने ट्रकला महामार्गावर थांबवल्याचा Video आला समोर...
समृद्धी महामार्गावरील 12 जणांच्या मृत्यूला आरटीओ जबाबदार, RTOने ट्रकला महामार्गावर थांबवल्याचा Video आला समोर...
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळानं घाला घातला. समृद्धी' महामार्गावर काल अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने थांबवला असतानाचा व्हिडीओ समोर आलाय. याच ट्रकला धडकून ट्रॅव्हल्समधील 12 जणांचा मृत्यू झालाय.

दरम्यान हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचं नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.

समृद्धी महामार्गावर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जांबरगाव टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय.ज्यात लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे.समृद्धी महामार्गावर आरटीओने अवैधरीत्या थांबवलेल्या ट्रकला ट्रॅव्हलरच्या चालकाची झोपेत धडक दिल्याने अपघात झाला आहे. आरटीओने हायवेवर  अपघातग्रस्त ट्रकला थांबवल्याचा  व्हिडीओ समोर आला आहे.  या व्हिडीओनंतर समृद्धी महामार्गावरील अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट आले आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातातील जखमींच्या मते आरटीओची गाडी ट्रकचा पाठलाग करत होती. टोलनाक्यापासून काही अंतर पुढे गेल्यावर आरटीओनं ट्रकला थांबवलं. ट्रक महामार्गाच्याकडेला उभा राहिला पण त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या टेम्पो ट्रॅव्हरलरची ट्रकला जोरदार धडक बसली .  दरम्यान आरटीओच्या वाटमारीमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.  अपघातातील गंभीर जखमींना वैजापूरमधलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह एका चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाखांची मदत जाहीर केलीय..जखमींवरही सरकारी खर्चातून उपचार करण्यात येणार आहेत.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून समृद्धी महामार्ग बनवला खरा मात्र त्यावरील अपघातांचं सत्र थांबता थांबत नाही. ओव्हर स्पीड, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि अपुऱ्या सुविधा ही त्यामागची कारणं आहेत. यावेळच्या अपघातामागे मात्र आरटीओ अधिकाऱ्यांची चूक असल्याचे व्हिडीओवरून स्पष्ट झाले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group