महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येताना दिसत आहे. धुळे शहरातील घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याच्या संशयावरून एका ऐंशी वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विश्वकर्मा नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ११२ या पोलिस हेल्पलाइनवर एका वृद्ध व्यक्तीने लहान मुलीशी गैरवर्तन केल्याची माहिती दिली होती. माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिस येण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून तक्रार नोंदवून घेतली.
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर म्हणाले, “घटनेची माहिती मिळताच आमचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीची सुटका वेळेत झाली. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.