नाशिक : ५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक व रोजगार सेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सोनिराम धनराज शिरसाठ (वय 47, ग्रामसेवक, मांडकी आणि अंतुरली बुद्रुक, ता. भडगाव, जि. जळगाव. रा. पाचोरा जि जळगाव) व जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय 38, रोजगार सेवक, मांडकी ता. भडगाव, जि. जळगाव रा पाचोरा जिल्हा जळगांव) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दि.२३ जून रोजी प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे आज पडताळणी केली असता आरोपीने ६००० रुपयांची मागणी करुन तडजोड अंती ५०००रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
म्हणून आज रोजी सापळा कारवाई आयोजित केली असता आरोपीने ५००० रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. पाचोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.