नाशिक :- 500 रुपयांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मनोज दत्तात्रय मंडाले सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, नाशिक असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दावा न्यायालयात दाखल करायचा होता. हा दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो. ही कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर सदरचे प्रकरण मंडाले यांचेकडे जमा करावे लागते.
परंतु सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम प्रकरण जमा करण्यापुर्वी मंडाले यांचेकडून काढून न घेतल्यास ते सदर प्रकरणात त्रुटी काढतात. त्यामुळे सदर प्रकरण जमा करण्यापुर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी मंडाले यांचेकडे घेवून गेले असता कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी मंडाले यांनी तक्रारदार यांच्याकडे काल 500 रुपये लाचेची मागणी केली.
आज सदर 500 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके यांनी केली.