
निफाड (वार्ताहर) :- निफाड येथील भुमी अभिलेख कार्यालयातील शिपाई नितेंद्र गाढे यास साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना अटक करुन निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए व्हि गुजराथी यांचेसमोर हजर केले असता त्यास ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .
निफाड भुमी अभिलेख कार्यालयातील शिपाई नितेंद्र गाढे यास, शुक्रवार दि ७ रोजी तक्रारदाराकडुन मोजणीच्या हद्दी खुणा दर्शविण्यासाठी चार लाखाची मागणी करुन तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यास अटक करुन निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तपास अधिकारी पोलिस निरिक्षक मिरा आदमाने यांनी हजर केले.
सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकिल अँड रामनाथ शिंदे यांनी आरोपीची आवाज नमुने व अधिक तपासाकरिता पोलिस कोठडीची मागणी केली. गुन्ह्यातील आरोपीच्या कार्यालयात काम करणारे इतर अधिकारीही सहभागी असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीवरून स्पष्ट होते. त्यांची नावे अद्याप उघड झाली नाही त्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.
आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे. आरोपीने गंभीर असामाजिक गुन्हा केला आहे असा निष्कर्ष नोंदवत न्यायलयाने तपासकामासाठी आरोपीला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.