२ कोटी रुपयांची लाच मागून ७५ लाखांची लाच घेताना एका अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात
२ कोटी रुपयांची लाच मागून ७५ लाखांची लाच घेताना एका अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

मुंबई :- २ कोटी रुपयांची लाच मागून पहिला हफ्ता म्हणून ७५ लाख रुपयांची लाच घेताना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह तीन जणांना लाचुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

मंदार अशोक तारी, निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, अंधेरी पूर्व, मुंबई, मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा, (वय 33) प्रॉपर्टी इस्टेट एजंट (खाजगी इसम) व प्रतिक विजय पिसे (वय 35), कंत्राटदार (खाजगी इसम) अशी लाच घेणाऱ्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी यांचे प्लॉट क्रमांक 191 192, शहीद भगतसिंग कॉलनी, जेबी नगर, मुंबई 58 येथे स्वतःच्या मालकीची चार मजली इमारत आहे. या इमारतीचे वरील दोन मजले अवैध असून त्यावर निष्काशन कारवाई न करण्यासाठी तसेच नियोजित प्लॉट क्रमांक 193, 194 खरेदी केले नंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन कोटी रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. 31 जुलै 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे लेखी तक्रार दिली. त्यानुसार दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तारी यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितली.

पहिला हप्ता म्हणून रुपये 75 लाख इतकी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे तत्काळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान शेख व पिसे यांनी संगनमताने तारी यांच्या सांगण्यावरून रोख रुपये 75 लाख इतकी लाचेची रक्कम स्वीकारली असता शेख व पिसे यांना रंगेहात पकडण्यात आले. 

तारी, शेख व पिसे यांच्याविरोधात ला. प्र. वि.,  मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group