22 हजारांची लाच घेताना अव्वल कारकून जाळ्यात
22 हजारांची लाच घेताना अव्वल कारकून जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

22 हजारांची लाच घेताना अव्वल कारकूनास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रवींद्र बळीराम दहीते (वय 55), अव्वल कारकून, धान्य वितरण अधिकारी कार्यालय, मालेगाव असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते सामाजिक कार्य ही करतात.

तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील 15 गरीब व गरजू कुटुंबीयांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्डची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रारदार हे दि. 4 एप्रिल रोजी मालेगाव येथील रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव  यांच्याकडे त्यासंदर्भात गेले होते.

त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांचे 1500 रुपये याप्रमाणे एकूण 15 कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी  एकूण 22,500 रुपयांची मागणी केली. आज 22,500 रुपये पैकी 500 रूपये तक्रारदार यांना परत करून 22,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस नाईक दिपक पवार, पोलीस शिपाई संजय ठाकरे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group