दैनिक भ्रमर : वीस हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती ३ हजार रुपयांची लाच घेताना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. संभाजी शिवाजी घोडे (वय 32, रा. श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) असे लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार ह्या कुटुंबासह श्रीगोंदा येथे राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा हा शिक्षण घेत असून त्याचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने घोडे यांनी तक्रारदार यांच्या मुलाला पोलीस स्टेशन येथे बोलविले होते. त्याचवेळी तक्रारदार यादेखील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तक्रारदारांनी मुलाच्या विरोधात ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्याशी बोलणे करून प्रकरण आपसात मिटवले होते.
परंतु आरोपी घोडे यांनी तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाईल ताब्यात घेऊन तक्रारदार यांना म्हटले की मी तुमचे प्रकरण मिटविण्यासाठी मध्यस्थी केली, तुमच्या मुलावर गुन्हा दाखल झाला असता, तो गुन्हा दाखल होऊ दिला नाही. त्या करिता मला 20000 रुपये द्या तरच तुमचा मोबाईल परत देईल. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाप्रवि अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार नोंदविली.
या तक्रारीप्रमाणे दि. 11 व 12/08/2025 रोजी संभाजी घोडे यांचे विरुद्ध लाच मागणी पडताळणी केली असता घोडे यांनी तक्रारदार यांचेकडे सदर प्रकरणात मदत केली त्या बदल्यात 3000 रुपयांची मागणी करून लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे आज दि. 12 रोजी सापळा कारवाई दरम्यान खोडे यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतः 3000 रुपयांची लाच स्वीकारलेले आहे. खोडे यांना जागीच लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आलेले असून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.