2 लाख रुपयांची लाच मागून पहिला हफ्ता म्हणून 50 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मेघशाम रोहिदास बोरसे (वय 45 ग्रामसेवक म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे (वर्ग 3) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, यातील तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी बोरसे यांची भेट घेऊन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील विकास कामांना मंजुरी मिळणे करिता अर्ज दिला होता. बोरसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रकेत 12,00,000 रुपये किमतीच्या 20 टक्क्याप्रमाणे 2,40,000 रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांनी दि. 4.3.2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती.
या तक्रारीची दि.7.3.2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान बोरसे यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अंती 2,00,000 रुपये लाचेची मागणी केली. या रक्कमेपैकी 50,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते.
काल सापळा आयोजित केला असता बोरसे यांनी तक्रारदार यांचे कडे 2,00,000 रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50,000/- रुपये मजदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.