नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अडीच लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेताना नवापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे (वय ४९, रा. उपनगर, नाशिकरोड) असे लाच घेणार्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, वारे यांच्यावर असलेल्या रोषापायी संतप्त नागरिकांनी शासकीय वाहनावर दगडफेक करून आपला रोष व्यक्त करीत वारेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांच्यावर गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यांतर्गत सोनगड पोलीस ठाण्यात प्रोहिबिशनचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी तापीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवापूर पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांनी सोनगड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये मध्यस्थी करून अटकेपासून बचाव होण्यासाठी तक्रारदार यांना मदत केली होती.
त्याच्या मोबदल्यात वारे यांनी तक्रारदाराच्या मित्राकडे तक्रारदारामार्फत २,५०,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी भीतीपोटी दि. ५ मार्च २०२४ रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एक लाख रुपये लाच म्हणून दिले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाख रुपयांच्या अधिक लाचेची मागणी केली. म्हणून तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर व पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली.