चाडेगाव येथे यात्रोत्सवासाठी जमा असलेल्या वर्गणीच्या हिशेबावरून युवकावर गोळीबार
चाडेगाव येथे यात्रोत्सवासाठी जमा असलेल्या वर्गणीच्या हिशेबावरून युवकावर गोळीबार
img
Chandrakant Barve


नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकरोडपासून जवळच असलेल्या चाडेगाव रस्त्यावर एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, यात जखमी झालेल्या या युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाडेगाव येथे ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त काल रात्री गावात नियोजनासंदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सध्या गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने यात्रोत्साची बैठक रद्द झाली.

त्यानंतर गावातीलच सचिन मानकर यांच्यासह चार-पाच जण आणि ज्ञानेश्‍वर बंडु मानकर हे सोबतच एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धीनाथ हॉटेलच्यापुढे नाल्याच्याजवळ त्यांची यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरु असताना मागील वर्गणीचे पैसे  ज्ञानेश्‍वर उर्फ बंडु मानकर याच्याकडे जमा होते.

याबाबत सचिन मानकर यांनी त्याला विचारणा केली असता दोघांमध्ये वाद वादी झाली. याचा राग अनावर होऊन सचिन मानकर याने आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून ज्ञानेश्‍वर उर्फ बंडू मानकर याच्यावर गोळीबार केला. त्यात दोन गोळ्यांपासून त्याने बचाव केला. मात्र 1 गोळी त्याला चाटून गेली. तर एक गोळी कमरेला लागल्याने तो जखमी झाल्याचे समजते.

दरम्यान सचिन मानकर याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गोळीबाराने चाडेगाव परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट दिली असून, आरोपीच्या शोधासाठी तपास पथके तयार करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group