20 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायतीच्या 2 कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
महेश रमेशराव वानखेडे (वय 30 , लिपीक ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि.जळगांव, मुळ रा. नेर ता. नेर
जि. यवतमाळ) व समाधान लोटन पवार (वय 35, लिपीक, ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि. जळगांव रा. लालबाग कॉलणी पारोळा ता. पारोळा जि. जळगांव) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ग्रामपंचायत
निवडणुक 2021 मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तीन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता.
सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील महेश वानखेडे यांचेकडे पेडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे वानखेडे यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की तुमचा तीन अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो.
त्यासाठी मला 30000 रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 9 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पडताळणी केली असता वानखेडे यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली.
त्यानंतर आज रोजी वानखेडे यांनी सांगितल्याने समाधान पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात 20000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ प्रदिप पोळ यांनी केली.