३६ हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकासह मुख्याध्यापीकेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सौ.मनीषा पितांबर महाजन (वय 57, मुख्याध्यापिका, जनता शिक्षण मंडळाचे धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि.जळगाव, रा. पंचायतराज ट्रेनिंग सेंटर समोरील चिनावल रोड, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव) व आशिष यशवंत पाटील (वय 27, कनिष्ठ लिपिक, जनता शिक्षण मंडळाचे धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि .जळगाव) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची सून ही जनता शिक्षण मंडळ खिरोदा ता.रावेर या संस्थेच्या धनाजी नाना विद्यालय या शाळेत कायमस्वरूपी उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या सुनेने प्रसूती रजा मिळणे करिता वैद्यकीय प्रमाणपत्रासह दि. 2.6.2025 रोजी मुख्याध्यापिका महाजन यांच्याकडे अर्ज दिला होता.
तक्रारदार यांच्या सुनेच्या सांगण्यावरून तक्रारदार यांनी शाळेत जाऊन महाजन यांची भेट घेऊन त्यांच्या सुनेच्या प्रसूती रजेच्या अर्जाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना 5,000 रुपये प्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी तक्रारदार यांच्याकडे एकूण 30,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दि.7.7.2025 रोजी एसीबीकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या सुनेची प्रसूती रजा मंजूर करून देण्यात करिता प्रति महिना 6,000/- रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 36,000/- रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर दि. 07.07.2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून 36,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली.
ही रक्कम कनिष्ठ लिपिक आशिष पाटील यांना मोजण्यास देऊन पाटील हे लाचेची रक्कम मोजत असताना महाजन व पाटील यांना रंगेहात पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध सावदा पो. स्टे. येथे भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला.