नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बांधकामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ठेकेदाराकडून 33 हजार रुपयांची स्वीकारताना मालेगाव मनपाच्या वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून, पथकाने त्याच्या घराच्या घेतलेल्या झडतीत 13 लाखांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने आढळून आले आहेत.
सचिन सुरेंद्र महाले (वय 51, रा. प्लॉट नंबर 41, वर्धमाननगर, एलआयसी ऑफिस, कॅम्प, मालेगाव) असे लाच स्वीकारताना अटक केलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून, मालेगाव महानगरपालिकेअंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाचे नावे घेतलेले होते. त्याप्रमाणे काम पूर्ण करून केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरिता महाले यांना भेटले असता ते मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून त्यांचे नाला बांधकामाचे बिल मंजूर करून देतो, असे सांगून बिल मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्क्यांप्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले होते.
त्याप्रमाणे नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्यानंतर तक्रारदार हे महाले यांच्या भेटीसाठी गेले असता दि. 13 जून रोजी महाले यांनी तक्रारदार यांच्याकडे 33 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना दि. 21 जून रोजी पंचांसमक्ष तक्रारदारांकडून 33 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, किल्ला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव व पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दूल व वाहनचालक पोलीस हवालदार परशुराम जाधव यांनी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या गुन्ह्यातील सचिन महाले (रा. वर्धमाननगर, मालेगाव) याच्या राहत्या घराची पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी घरझडती घेतली असता, त्यावेळी महाले यांच्या घरात 13 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम व 133 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन व सोन्याचा तुकडा असा मुद्देमाल आढळून आला.