३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती २५ हजारांची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
संतोष बाबासाहेब शेलार, (वय 40, तलाठी सजा कनोली, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर रा. इंदिरानगर, गल्ली नंबर 9, संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी दिनांक 07/07/2025 रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार यांच्या गावात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यास तहसिलदार संगमनेर यांनी मंजुरी दिलेली आहे.
सदर वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी पाच ट्रॅक्टर वाहनांना व वाळू उपसा करण्यासाठी एक जेसीबी व एक फरांडी ट्रॅक्टरला मंजुरी मिळाली आहे. तहसिलदार, संगमनेर यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाहतूक करण्यासाठी मंजुरी दिलेल्या ट्रॅक्टर मध्ये तक्रारदार यांच्या मालकीचा एक ट्रॅक्टर आहे.
तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करीत असताना लोकसेवक संतोष शेलार, तलाठी कनोली यांनी तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर अवैद्यरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल, सदरची कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.
दिनांक 07/07/2025 रोजी तक्रारदार यांना पंचासोबत तक्रारदार यांच्या तक्रारी प्रमाणे आरोपी संतोष शेलार, तलाठी, कनोली यांच्याकडे लाच मागणीची पडताळणी करण्याकरिता पाठविले असता आरोपी शेलार यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडअंती 25000/- लाचेची मागणी केली.
दि.07/07/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून आरोपी शेलार यांनी पंचा समक्ष 25000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपींचे अंग झडती मध्ये त्यांच्याकडे 25,000 रुपये, 1 मोबाईल असा ऐवज मिळून आला. आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.