नाशिक :- लाच म्हणून 30 लाख रुपये मागून पहिला हप्ता म्हणून 5 लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
हरिभाऊ खाडे (वय 52), पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय बीड वर्ग १ (रा. चानक्यपुरी, बीड), रविभुषन जाधवर सहायक फौजदार आर्थिक गुन्हे शाखा बीड व कुशाल प्रविण जैन (वय 29, रा मंत्री कॅालनी, बीड) खाजगी ईसम अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार आणि त्याचा खाजगी चालक यांनी मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांचे शाळेच्या इमारतीच्या बांधकामा करीता मटेरीअल पुरवले होते.
मोबदला म्हणुन ६० लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते. तथापी पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे बबन शिंदे व इतरांवर बॅंक अपहार प्रकरणी दाखल असुन तपास पो. नि. खाडे आर्थिक गुन्हे शाखा बीड हे करत आहेत. यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली 60 लाख रक्कम बॅंक अपहारातील आहे असे भासवून नमुद गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी केली.
तसेच पोनी खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच पोनी खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी 50 लाख या प्रमाणे 1 कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 30 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. तसेच तक्रारदार यांचेकडुन पहिला हप्ता म्हणुन 5 लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन मौजकर टेक्सटाईल यांचेकडे देण्यास सांगितले. त्यावरुन सापळा कारवाईचे आयोजन मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड येथे केले.
खाजगी इसम कुशाल जैन याने पोनी हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडुन 5 लाख रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह पकडण्यात आले. पोनी खाडे सहायक फौजदार जाधवर व खाजगी इसम कुशाल जैन यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.