नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- जळगाव-भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती घेतली असता तब्बल ४० लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल आढळून आला आहे. संशयित सोनवणे हा अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे व किरण माधव सुर्यवंशी (३७ रा. नवीन हुडको, भुसावळ) यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनिमय अंतर्गत गुन्हा दाखल आह. सदर गुन्ह्यातील सोनवणे हा फरार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुसवळ येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेत शुक्रवार (दि.२९) सकाळी ७.३० वाजता दोन पंच आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष व्हिडिओ शुटिंगसह त्याच्या राहत्या घराची झडती घेतली.
त्यामध्ये एक लाख ४९ हजार २९० रुपयांच्या देशी-विदेशी ब्रॅण्डच्या तब्बल दोन हजार १४४ मद्याच्या बाटल्या. अडीच हजार रुपये किंमतीच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, दोन लाख १५ हजार २५४ रुपये किंमतीची बुलेट मोटार सायकल, १४ लाखाच्या कारचे कागदपत्रे, दिड लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोने-चांदीचे दागिने, ६० हजार रुपये किंमतीच्या नऊ एमएम पिस्टलच्या दहा रिकाम्या पुंगळ्या, तब्बल आठ लाखांची रोकड, तब्बल ९ लाखांच्या सोने-चांदी खरेदी केल्याच्या मुळ पावत्या, नऊ लाखांपेक्षा अधिक किंमतीचे टिव्ही , फ्रिज, एसी व इतर आरामदायी वस्तू असा एकूण ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.