3 हजार रुपयांची लाच घेताना विहितगावच्या तलाठ्याला व एका खासगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सतिष गिरीश नवले (वय 48, तलाठी सजा-विहीतगांव ता.जि. नाशिक, रा. फ्लॅट नंबर - 303, अक्षराधारा ई, सँडी बेकरी जवळ, आनंद नगर, उपनगर, नाशिक) व दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे, (वय 43), तलाठी कार्यालय विहितगाव येथे तलाठी यांना खाजगी मदतनीस, रा. राधिका निवास, उज्वल कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक-पुणे रोड चेहडी बु ll नाशिक रोड नाशिक) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये 1,00,000 चे 25 टक्के म्हणजे 25, 000 रुपयेचा भरणा केला असल्याने तहसीलदार नाशिक यांनी सतीश नवले, तलाठी, विहित गाव यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा यासाठी आदेशित केले होते.
तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने सतिष नवले व त्यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खाजगी मदतनीस दत्तात्रय ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात दत्तात्रय ताजनपुरे यांनी सतिष नवले, तलाठी विहितगाव, यांचे सांगण्यावरून तक्रारदारकडे 4000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंति 3000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व आज पंचांसमक्ष 3000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.