नाशिकमध्ये 2500 रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शंकर जनार्दन गोसावी, सहा. पोलीस फौजदार असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची नेमणूक सध्या पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे/ restaurant चालवितात. हे कॅफे/ restaurant हे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी - विद्यार्थीनी यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थि यांना privacy असावी म्हणून तक्रारदार यांनी रेस्टॉरंट मधील टेबलांना आडोसा केला होता.
या बाबत माहिती यातील गोसावी यांना झाल्याने त्याने सुमारे सहा महिने पूर्वी तक्रारदार यांच्याकडे येऊन त्यांना तु कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफे वर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा २००० ते ३००० रुपये लाच म्हणून घेत असे.
तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी गोसावी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता गोसावी हे विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस येथे नेमणूकीस असताना तक्रारदार चालवीत असलेल्या restuarant व्यवसायशी त्यांचा काहीएक संबंध नसताना तक्रारदार यांचे restuarant सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली दिली. आज त्याने २५०० रुपये लाच मागणी करून ती रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली.