नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एका पानटपरी दुकानदाराविरोधात गुटखा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करू नये, म्हणून 12 हजार रुपयांची लाच घेताना धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अझरुदिन झहिरुदिन शेख (वय 42) आणि त्याचा खासगी पंटर बासित रशीद अन्सारी (वय 24) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
कॉन्स्टेबल शेख याने तक्रारदार पानदुकानदाराकडे व्यवसाय चालविताना गुटखा प्रतिबंधक कारवाई करू नये, म्हणून 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या रकमेपैकी 12 हजार रुपयांचा हप्ता कॉन्स्टेबल शेख यांनी खासगी पंटरमार्फत स्वीकारला. यावेळी दोघांनाहीं रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
धुळे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे आणि हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, कॉन्स्टेबल मकरंद पाटील व प्रवीण पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. याबद्दल नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले.